सोलापूर समाचार (१९००): गिरी केस पार्ट - 2

 आजच्या डिजिटल युगात सायबर क्राईम आणि ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या आपण रोज वाचतो. पण तुम्हाला माहित आहे का? १९०० च्या काळात, म्हणजे सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी, जेव्हा इंटरनेट नव्हते, तेव्हाही लोकांची फसवणूक करण्यासाठी भामटे नवनवीन शक्कल लढवत असत. 'सोलापूर समाचार' या तत्कालीन वृत्तपत्रात (ऑगस्ट आणि ऑक्टोबर १९००) छापून आलेल्या काही बातम्यांवरून त्याकाळी सोलापूर आणि आसपासच्या भागात घडणाऱ्या गुन्ह्यांचा आणि 'स्कॅम'चा (Scam) उलगडा होतो.

सोलापूर समाचारच्या 1900 च्या अंकातील दोन बातम्या

१. भामट्यांची नवीन टोळी: देवाच्या नावाने आर्थिक फसवणूक ( गिरी केस)

आज जसे लोक 'लॉटरी लागली आहे' किंवा 'स्वस्त कर्ज मिळेल' या आमिषाला बळी पडतात, तसाच प्रकार १९०० साली सुद्धा घडत होता. 'सोलापूर समाचार'मध्ये "भामट्यांची नवीन टोळी" या मथळ्याखाली एक सविस्तर बातमी छापली होती.

स्कॅम (Scam) काय होता?

काही लबाड लोक स्वतःला 'गिरीच्या व्यंकोबा' देवस्थानाचे गुमास्ते (प्रतिनिधी/मुनीम) म्हणून फिरत असत. त्यांचा दावा असे की, "देवाकडे भरपूर पैसा आणि सोने आहे, आणि आम्ही गरजू लोकांना देवस्थानाच्या पेढीतून अत्यंत कमी व्याजाने कर्ज मिळवून देण्याच्या अमिषाने फसवणूक करत असत ही टोळी सावजाला हेरायची आणि त्यांना सांगायचे की मोठी रक्कम कर्जाऊ मिळेल, पण त्यासाठी काही "कानगी" (वर्गणी किंवा फी) किंवा ॲडव्हान्स म्हणून काही रक्कम आधी द्यावी लागेल.

वाई येथील अण्णासाहेब साठे नावाच्या व्यक्तीला अशाच एका टोळीने गंडा घातला होता. त्यांना २१,००० रुपये कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून २१० रुपये 'फी' म्हणून घेण्यात आले. पुढे कर्जाची रक्कम आणण्यासाठी म्हणून साठे यांच्या भावाला हे भामटे घेऊन गेले, पण पुढे त्यांचा पत्ता लागला नाही. साठे यांच्या भावाचा खून झाल्याची शंकाही तेव्हा व्यक्त केली गेली होती.

(पुढे हि शंका खरी ठरली व खुनाचे सत्र सुरू झाले त्याची हाकिगत याआधीच्या गिरी केस या पोस्ट मधे आली आहे )

पोलिसांची कारवाई:

या प्रकरणाचा तपास करताना तासगाव आणि हरोळी (सांगली जिल्हा) परिसरात पोलीस पोहोचले. तिथे 'दयाराम', 'सखारामदास' आणि 'रघुनाथदास' (खरे नाव आत्माराम) या भामट्यांना पकडण्यात आले. त्यांच्या झोळीत काही बनावट शिक्के आणि पत्रे सापडली, ज्याचा वापर ते लोकांना फसवण्यासाठी करत असत.

२. विसापूर किल्ल्यातील 'भुतांचा' सुळसुळाट आणि खुनी सूड

दुसरी बातमी ही अंधश्रद्धेचा फायदा घेऊन केलेल्या गुन्ह्याबद्दल आहे. पुणे जिल्ह्यातील खडकी स्टेशनपासून जवळच असलेल्या विसापूरच्या डोंगरी किल्ल्याच्या परिसरात हा प्रकार घडला.

बनावट भुतं

किल्ल्याच्या पायथ्याशी काही सुखवस्तू कुणबी लोक राहत होते. तिथे काही महिने रात्रीच्या वेळी विचित्र किंकाळ्या आणि आरडाओरडा ऐकू येऊ लागला. "आम्हाला जेवण आणि दारू द्या, नाहीतर तुमचा छळ करू," अशा धमक्या 'भुतांच्या' नावाने गावकऱ्यांना दिल्या जात होत्या. एकदा गावकऱ्यांनी धधस करून एका भुताला पकडले असता, तो 'धोंडी' नावाचा स्थानिक माणूस निघाला. त्याला शिक्षा झाली.

शिक्षा भोगून आल्यावर धोंडीने सूड घेण्याचे सत्र सुरू केले. त्याने स्वतःच्या पुतण्याला दगडाने ठेचून मारले. त्याला वाचवायला आलेल्या भावालाही ठार केले. हा क्रूरकर्मा इथेच थांबला नाही, तर त्याने स्वतःच्या पत्नीला फसवून रानात नेले आणि तिचीही हत्या केली. असे मिळून त्याने ७-८ लोकांचा बळी घेतल्याचे बातमीत म्हटले आहे. अखेर पोलिसांनी या खुनी इसमाला जेरबंद केले.

'ही हकीकत वाचून लोकांनी सावध व्हावे,' असा इशारा तेव्हाच्या वृत्तपत्राने दिला होता. इतिहासाची पाने चाळली की लक्षात येते, काळ बदलला तरी गुन्हेगारीची मानसिकता आणि माणसाचा लोभ तोच आहे. गिरी केस पार्ट 1

(गिरी केस' हा पहिला भाग वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.")

संकलन/ भाषांतर

अतुल देशपांडे

सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी ©


Comments

Popular posts from this blog

सोलापूर विमान उड्डाणाच्या नोंदी -1928

काडीची हि किंमत आहे. ( सोलापूर 1908)

१९१० सालचं सोलापूर: जेव्हा मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते | Solapur History & Memories